अमरावती - देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातला असून सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अचानक आलेल्या या संकटाची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. परिणामी शेतकऱ्यांचे नगदी पीक कापूस, तूर व हरभरा बाजारात गेलाच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आधीच हतबल झालेल्या अन्नदात्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे बियाण्याच्या दरवाढीचे.
१ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू केली आहे. कोरोनाची भीती असतानाही शेतकरी योग्य खबरदारी घेऊन खते, बी-बियाणे, शेती अवजारे व आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पण मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बी-बियाण्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या बॅगची पिशवी २४०० रुपयाला विकली जात आहेत. मागील वर्षी हीच पिशवी १८०० रुपयाला होती.
गंभीर बाब म्हणजे, शेतकऱ्याने पिकवलेला सोयाबीन ३ हजार रुपये क्विंटलने विकला जातो. पण त्याच शेतकऱ्याला बियाण्याच्या रुपाने हा सोयाबीन ८ हजार रुपये क्विंटलने खरेदी करावे लागतो. हे सर्व पाहून एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आली, असल्याची प्रतिक्रिया दिली.