अमरावती- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील मागील दहा दिवसापासून बंद आहेत. त्यातच आता खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतमाल विक्री अभावी घरी पडून असल्याने शेताची मशागतीला पैसे कुठून आणायचे, बी बियाणे कसे खरेदी करायचे? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल तसाच पडून आहे. त्यामुळे तत्काळ जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना पेरणीची पूर्वतयारी करण्यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते. घरात असलेला शेतमाल विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून शेतकरी बियाणे खतांची खरेदी करतात. परंतु गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आम्ही शेतमाल विकायचा कुठे व पेरणी करायची कशी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.
बहुतेक शेतकऱ्यांच्या घरी गहू, तूर, भुईमूग सोयाबीन आदी शेतमाल पडून आहे. बाजार समिती उघडली की तो माल विकून शेतकऱ्यांना पुढचे नियोजन करावे लागणार आहे. शेतमाल विकून मिळणाऱ्या रकमेतून कौटुंबिक गरजांसोबत शेतातील पेरणीची व्यवस्था शेतकरी करतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे बाजार समितीने खरेदी केलेले धान्य खराब होत असून व्यापारी वर्गाला फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने बाजार समिती सुरू करावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे.