अमरावती - गेल्या १५ दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, संत्रा, मूग, उडीद आदी पिके जमीनदोस्त झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, आता प्रत्यक्ष नुकसान भरपाई कधी मिळणार? हाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
'हातातोंडाशी आलेला घास हिरावला, सांगा आम्ही जगायचे कसे?' जिल्ह्यातील शिरजगावातील शेतकरी जयंतराव बेलसरे यांनी सोयाबीनची काढणी केली होती. त्यानंतर शेतामध्ये गंजी लावण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाची अवकृपा झाली. त्यामुळे संपूर्ण सोयाबीनचे नुकसान झाले. त्यांनी आशेपोटी मळणी यंत्रातून सोयाबीन काढायला सुरुवात केली. मात्र, कधीकाळी पिवळे दिसणारे सोयाबीन पावसामुळे काळे झालेले दिसले. संपूर्ण ३ एकरावरील पिकाचे नुकसान झाल्याने आता कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
एकट्या जयंतरावांची ही परिस्थिती नाही, तर ओल्या दुष्काळात सापडलेल्या प्रत्येक बळीराजाची ही दयनीय अवस्था आहे. शासनाने हमी भावाच्या घोषणा दिल्या. मात्र, शासकीय खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे खार-तळेगावच्या कृष्णाराव रोकडे या शेतकऱ्याने बाजारसमितीमध्ये सोयाबिन विकायला आणले. मात्र, कुठलाही व्यापारी त्यांचे सोयाबीन खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
केवळ सोयाबीनच नाहीतर कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातील कापूस निघायला सुरुवात झाली. मात्र, सतत परतीचा पाऊस बरसला. त्यामुळे कपाशीचे देखील नुकसान झाले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन नुकसानीची पाहणी करीत आहेत. पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. तसेच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देखील देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खरच मिळणार आहे का? हाच प्रश्न शेतकरी विचारत आहेत.