अमरावती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा आणि धारणी तालुक्यातील बिजू धावढी या गावांची पायलट रनमध्ये निवड करण्यात आली असून या गावांच्या पात्र लाभार्थींच्या याद्या सोमवारी सकाळी संकेतस्थळावर प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
यावेळी वऱ्हा गावातील अनेक शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत संवाद देखील साधला. कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावातील 343 आणि धारणी तालुक्यातील बिजू धावढी गावातील 134 अशा एकूण 477 पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून प्रत्येक ठिकाणी आपले सरकार केंद्र, संग्राम केंद्र आणि बँकेद्वारे यादीप्रमाणे पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.