अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावात संपूर्ण बांबू केंद्राच पर्यावरणपूरक राख्या बनवल्या जात आहेत. राखी खराब झाली की ती फेकून दिली जाते. मात्र, आता ही राखी ज्याठिकाणी फेकली त्याठिकाणी त्या राखीपासून झाड तयार होणार आहे. त्यामुळे यंदा या राख्यांना देशातील अनेक राज्यांसह इतर देशात मागणी आहे.
अमरावतीच्या धारणी तालुक्यात लवादा गाव आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून बांबूपासून विविध पर्यावरणपूरक शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. आता याच लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून तबल ३० प्रकारच्या पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या जातात. बाजारात विक्रीसाठी असलेल्या इतर राख्या सुंदर दिसण्यासाठी त्यावर चकाकणारे मणी लावलेले असतात. मात्र, मेळघाटातील या राख्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या राख्यांमध्ये बीज टाकलेले आहे. त्यामुळे ही राखी खराब झाल्यावर कुठे फेकली तर या राखीत टाकलेले बीज जमिनीत रोवले जाते. त्यानंतर त्याचे झाड तयार होते. त्यामुळे विदेशातील भारतीय पर्यावरणप्रेमींनी मेळघाटातील आदिवासी महिलांनी बनविलेल्या राख्यांची मागणी केली आहे. त्यांना आता या राख्या पाठवल्या जाणार आहे.