अमरावती -परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने कापूस, उडीद, सोयाबीन अशा पिकांना प्रचंड फटका बसला आहे. तर दुसरीकडे आता कापसावर गुलाबी बोंड अळी पडल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोंड अळीमुळे खराब झालेला कापूस तहसीलदारांच्या टेबलावर ठेवत मदतीची मागणी केली आहे.
बोंड अळीमुळे कापसाचे नुकसान, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने कापूस, उडीद, सोयाबीन अशा पिकांना प्रचंड फटका बसला आहे. तर दुसरीकडे आता कापसावर गुलाबी बोंड अळी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
वर्षाच्या सुरवातीलाच सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यावर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर परतीच्या पावसामुळे पिकांना फटका बसला. आता या संकटातून शिल्लक राहिलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसावर बोंड अळीने आक्रमण केल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.