अमरावती - गेल्या तीन दिवसांपासून सलग रिमझिम बरसणारा पाऊस सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुसळधार कोसळतो आहे. पावसामुळे संपूर्ण वातावरण ओलेचिंब झाले असून जिल्ह्यातील तलाव आणि धरणांची पाणीपातळी वाढायला लागली आहे.
अमरावतीत मुसळधार पाऊस; तलाव-धरणातील पाणीसाठ्यात वाढ
तीन दिवसांपासून सलग रिमझिम बरसणारा पाऊस सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुसळधार कोसळतो आहे. यामुळे शहरातील वडाळी आणि छत्री तलावाच्या खालावलेल्या पातळीत पाणीसाठा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, शहर आणि जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
जुलै महिना अर्ध्यावर येवूनही जिल्ह्यात पावसाची अवकाळी परिस्थिती होती. मात्र 25 जुलैपासून अमरावती शहर आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या रिमझिम पाऊसाचा वेग सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच वाढला. यामुळे शहरातील वडाळी आणि छत्री तलावाच्या खालावलेल्या पातळीत पाणीसाठा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची जलाशय पातळी 334.81 मिटर पर्यंत वाढली अजून सध्या उपयुक्त जलसाठा 80.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहानुर प्रकल्पाची पातळी 434.50 मिटर इतकी वाढली असून 14.57 दशलक्ष घनमीटर आहे. चंद्रभागा प्रकल्पाची पातळी494.80 मीटर इतकी वाढली आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 13.98 दशलक्ष घनमीटर आहे. पूर्ण प्रकल्पाची पातळी 445.60 मीटरपर्यंत वाढली असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 13.05 दशलक्ष घनमीटर इतका आहे. तर, सपन प्रकल्पाची पातळी 506.50 मीटर पर्यंत वाढली असून या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा हा 24.05 दश लक्ष घनमीटर इतका आहे. सोमवारी दिवसभर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.