अमरावती -औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. यावर काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेची चांगलीच कानउघडणी केली आहे. काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची काहीच गरज नसल्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध पुन्हा पुढे आला आहे.
कॉमन मिनीमम प्रोग्रामनुसार काम करण्यास कटिबद्ध -
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सामनामधील अग्रलेखाला जोरदार उत्तर दिले आहे. 'आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मते वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून यांचा खुलासा झाल्यानंतर पुढंच' असे असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
राऊत यांनी 'रोखठोक'मध्ये काय म्हटले -
औरंगजेब सेक्युलर असल्याचा युक्तीवाद काँग्रेसकडून करण्यात आला होता. या युक्तीवादाला खोडण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून काँग्रेसला टोला लगावला आहे. जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री ‘औरंगाबाद’ नाव असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे, यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये, या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व परिणाम निवडणुकीच्यावेळी मुस्लीम मतांवर होईल. तसेच स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे विरोध करणारे उपस्थित करत आहेत. ते काहीही असले, तरी औरंजेबाच्या कोणत्याही खुना मराष्ट्रात दिसू नये, या मताचा मोठा वर्ग असल्याचे राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात -
शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे, कारण औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले होते.
नामांतरावरून महाविकास आघाडीत सुरू आहेत वाद -
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वाद पेटला आहे. शिवसेनेसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे. 'संभाजीनगर' हे नाव शिवसेनेनेच औरंगाबादला दिले असून, या नामांतरासाठी शिवसेना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर सुद्धा शिवसेनेला हे नामांतरण करणे अवघड जात आहे. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.
हेही वाचा - औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, शिवसेनेचा काँग्रेसला टोला