अमरावती :शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांची गुरूवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम् येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आणि त्यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. त्यावेळी भिडे म्हणाले की, मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता.
जनमानसांच्या भावना दुखावल्या :यासंदर्भात तक्रार दाखल करताना महाराष्ट्र प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे यांच्या लाजिरवाण्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. संभाजी भिडे यांच्यासंदर्भात आपल्याकडे काही पुरावा आहे का, असे उलट पोलिसांनी आम्हाला विचारले असल्याचे कुयटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
भिडेंच्या अटकेची काँग्रेसने केली मागणी :संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.