महाराष्ट्र

maharashtra

रवी राणा यांच्याबाबत एक शब्दही न उच्चारता मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासाचा पाढा

By

Published : Oct 16, 2019, 7:46 PM IST

मुख्यमंत्र्यांनी अमरावतीत प्रचार सभा घेतली. या सभेत बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर ते टीका करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी विकास कामांचा पाढा वाचला.

अमरावतीत मुख्यमंत्र्यांची सभा

अमरावती -मुख्यमंत्र्यांची सभा लावून त्यांना माझ्या विरोधात बोलायला लावा, असे आव्हान बडनेरा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी दिले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवी राणा यांना सडेतोड उत्तर देणार अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी रवी राणा यांच्याबाबत एक शब्दही न उच्चारला नाही. यावेळी त्यांनी फक्त पाच वर्षात केलेल्या विकासाचा पाढा वाचून दाखवला. अमरावतीच्या नेहरू मैदान येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

अमरावतीत मुख्यमंत्र्यांची सभा

अमरावतीच्या नेहरू मैदान येथे अमरावती मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार प्रिती बंड यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री सभा मंचावर येण्याआधी अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे, दर्यापूरचे माजी आमदार अभिजित अडसूळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातुरकर ,तुषार भारतीय या सर्वांनीच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात आपल्या भाषणात टीकेची झोड उठवली.

रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात आणून माझ्या विरोधात बोलायला लावा ते बोलणार नाहीत, असे आधीच स्पष्ट केले असताना आज मुख्यमंत्री रवी राणा यांना सडेतोड उत्तर देतील अशी अपेक्षा बडनेरा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती. मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केल्यावर अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली. यासोबतच पाच वर्षाच्या काळात सरकारने केलेल्या विकासाचा पाढा वाचला. अमरावती शहर देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर असल्याचा अभिमानही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अमरावती आणि बडनेरा शहराच्या विकासासाठी डॉ. सुनील देशमुख आणि प्रिती बंड यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री रवी राणा यांच्यावर कडाडून टीका करतील अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी रवी राणा यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नसल्याने बडनेरा मतदार संघातील भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details