अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाची सीआयडी चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाची लक्षवेधी सुचना विधानसभेत लागली असता आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी या गंभीर प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खरे दोषी समोर येणार असल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधार चांदेकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २७ मे रोजी अभियांत्रिकी शाखेची मेकॅनिक्स विषयाची प्रश्नपत्रिका फुटली होती. या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना दाखल केली होती. सोमवारी ही लक्षवेधी विधानसभेत चर्चेला आली. २७ मे रोजी प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील केंद्राधिकाऱ्यांना महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिजित गालट याच्या मोबाईल फोनमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच आढळली होती. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकणाची परीक्षा व मूल्यांकन केंद्र संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी चौकशी केली. हा प्रकार गोडे अभियांत्रिकी महाविद्यालयातही समोर आला होता. वाशिम येथील संमती महाविद्यालयातील कर्मचारी ज्ञानेश्वर बोरे, लर्निंग स्पायरक या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका ऑन लाईन पुरविणाऱ्या विद्यापीठाने नेमलेल्या कंपनीचा कर्मचारी अशोक फाटे आणि यापूर्वी विद्यापीठात असणाऱ्या माईंडलॉजिक्स कंपनीत कार्यरत आशिष राऊत तसेच विद्यापीठात रोजंदारीवर काम करणाऱ्या रोहणकार नामक व्यक्तीचा हात असल्याचे डॉ. हेमंत देशमुख यांनी अधिसभेच्या बैठकीला माहिती देताना सांगितले होते. अधिसभेने या प्रकरणाची तक्रार पोलिसात देण्याची मागणी केली होती.