अमरावती-कोरोना महामारीच्या कठीण काळात देशभरातील मोठी शहरे ओस पडली आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून शहरात गेलेले लाखो मजूर मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतले. हजारो मजुरांनी तर अक्षरशः हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ कापून आपले गाव गाठले. नोकरीसाठी शहरात गेलेले प्रत्येकजण घरी येण्यासाठी धडपडत होते. अस असले तरी मात्र वृद्धाश्रमातील वृद्धांनी कोरोनाच्या काळातही अखेरचा श्र्वास वृद्धाश्रमातच घ्यायचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळातही पोटच्या लेकरांनी घरी नेलं नसल्याची खंत वृद्धाश्रमातील आई-वडिलांनी बोलून दाखवली.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते ते आजही सुरू आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घरगुती भांडण यामुळे काहीजणांनी आपल्या आई-वडीलांना वृद्धाश्रमात सोडले. कोरोनाच्या काळातही या लेकरांनी आपल्या आई-वडीलांसाठी घराचे दरवाजे उघडले नाहीत.
कोरोना काळातही पोटच्या लेकरांना वृद्धाश्रमातील आई वडिलांचा विसर.. - वृद्धाश्रम न्यूज अमरावती
कोरोनाची भीती 60 वर्षावरी नागरिकांना अधिक आहे. अशा परिस्थितीत वृद्धांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, वृद्धाश्रमाच्या जीवावर आई- वडीलांना सोडून त्यांची मुलं बेफिकीर आहेत. अशा कठीण काळात आई- वडीलांना घरी आणावे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांनीही घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना काळातही पोटच्या लेकरांना वृद्धाश्रमातील आई वडिलांचा विसर..
कोरोनामुळे इतरांचाही ओलावा तुटला..
ज्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्या मुलांनी आयुष्याच्या संध्याकाळी माय बापांना आधार देण्याऐवजी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आयुष्यात आनंद असो वा दुःख वृद्धाश्रमाच्या चार भिंतीआड हे वृद्ध त्यांना सामावून घेतात. वृद्धाश्रमात भेट देऊन या वृद्धावर मायेची फुंकर घालणारे अनेक आहेत.परंतु, कोरोनामुळे आपल्या जीवाची पर्वा करणाऱ्यांनीही आता वृद्धा श्रमाला भेट देणे बंद केले.