अमरावती - गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला होता. आता काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामाला लागला आहेत. मात्र १५ ऑक्टोबरनंतर विदर्भात परतीचा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती अमरावती हवामान विभागाचे अनिल बंड यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसाठी लगबग ३० ते ४० टक्केच सोयाबीन काढणीचे कामे पूर्ण -
अमरावती हवामान विभागाने 15 ऑक्टोबरनंतर विदर्भात परतीचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना आधीच पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे अनेकांची सोयाबीन पीक वाया गेले आहे. आता पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत केवळ ३० ते ४० टक्केच सोयाबीन काढणीचे कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना लवकर काढणीचे कामे करावी लागतील.
अजूनही मदत नाही -
अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला या पाच जिल्ह्यातील २ऑक्टोबरपर्यंतच्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे २ लाख ४२ हजार ५१३ शेतकरी बाधित झाले आहे. यामध्ये ६ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक सोयाबीन पिकांना फटका बसला. आता १५ तारखेनंतर पडणारा पाऊस पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाणे अटळ आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत गेला आहे.