महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दर्यापूर तालुक्यात ‘सीसीआय’ची कापूस खरेदीला सुरुवात - Sai agro industry cotton purchase daryapur

दर्यापूर तालुक्यात सीसीआयचे केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार बळवंतराव वानखडे यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री ठाकूर यांनी निगमचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

सी सी आई कापूस खरेदी दर्यापूर, Cci cotton purchase daryapur
Cci cotton purchase daryapur

By

Published : Jun 9, 2020, 4:41 PM IST

अमरावती- भारतीय कापूस मंडळाकडून (सीसीआय) आज दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील श्री. साई ॲग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस हमीभाव केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. हा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला.

दर्यापूर तालुक्यात सीसीआयचे केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार बळवंतराव वानखडे यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री ठाकूर यांनी निगमचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार तत्काळ केंद्र सुरू करण्याबाबत अकोला शाखा कार्यालयाला आदेशही प्राप्त झाले व ही सगळी प्रक्रिया एका आठवड्याच्या आत पूर्ण होऊन दर्यापूर तालुक्यात कापूस खरेदीलाही सुरुवात झाली.

यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, दर्यापूर कृउबाचे सभापती बाबाराव पाटील बरबट, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह निगमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर यावेळी म्हणाल्या की, जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची संख्या मोठी आहे. कोरोना संकटकाळात कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे कापूस खरेदीला गती येण्यासाठी, तसेच कुणीही पात्र शेतकरी बांधव हमीभाव मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नवे केंद्र उघडण्यासह पुनर्नोंदणीचाही निर्णय घेतला. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या नऊवर पोहोचली असून, खरेदीला गती मिळणार आहे.

याच अनुषंगाने खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या 18 वरून 25 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रशासनाने 10 कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी केवळ जिल्हा प्रशासनच नव्हे, तर मंडळे, महामंडळे, बाजार समित्या, पणन महासंघ, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या कामाला वेग आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

शासनाकडून सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी कोरोनाविरुद्धची आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, कामाचा वेगही कमी होता कामा नये. दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी व नियोजनानुसार खरेदी पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

खरेदी केंद्रावरील सुरक्षिततेकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे. वाढत्या तापमानामुळे आग लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कुठल्याही अडचणी आल्या तर तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कुठल्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश यशोमती ठाकूर यांनी दिले.

केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांचा यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात एकूण 8 कापूस खरेदी केंद्रे होती. त्यातील एक धामणगाव रेल्वे येथे सीसीएचे होते. उर्वरित केंद्रे 7 पणन महासंघाची आहेत. आता येवदा येथे सीसीआयचे केंद्र सूर झाल्याने खरेदी प्रक्रियेला अधिक गती येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details