अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात एका दोन वर्षीय बालकाला ताप होता. त्यावर घरगुती उपचार म्हणून त्याच्या आजीने पोटावर गरम सळईने चटके दिल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. पोटावर चटके दिल्यामुळे या बालकाची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. शुक्रवारी रात्री उशिरा या बालकाच्या आजीवर चिखलदरा पोलिसांनी जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
हेही वाचा -अमरावती : चिखलदऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी नाक्यावरच केली जाते कोरोना चाचणी
बाळाच्या आजीवर गुन्हा दाखल
चिखलदरा तालुक्यातील खटकाळी गावात एका दोन वर्षीय बालकाची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे बाळाच्या आजीने महिनाभरापूर्वी त्याच्या कानाला चटका दिला होता. त्यातही बाळाला बरे वाटत नसल्याने तिने चार दिवसांपूर्वी बाळाच्या पोटावर चटके दिले. याप्रकारामुळे जखमी झालेल्या बालकाला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसानंतरही बाळाच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा नाही, तर बाळाची आजी जासो गोंडान धांडेकर (रा. खतकाळी) यांच्या विरुद्ध सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.