अमरावती - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस राहीले आहेत. मात्र, अमरावती विधानसभा मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा उमेदवार कोण असणार याची प्रतिक्षा सर्वाना लागली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांनी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला आहे.
हे ही वाचा -राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश
दरम्यान, अमरावती शहर काँग्रेसने अमरावती मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात असावा अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. काँग्रेसकडून एजाज पहेलवान, विलास इंगोले, सागर देशमुख, विश्वास देशमुख यांची नावे समोर केली आहे. बुधवारी दिवसभर सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असेल हे आता गुरुवारी सकाळी स्पष्ट होणार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा -काँग्रेस म्हणते भाजपची पदयात्रा हे सोंग तर; गांधीचे आत्मचरित्र वाचावे, भाजपचे उत्तर