अमरावती - एकीकडे देशातील नागरिक कोरोनाच्या दहशतीत आयुष्य जगत आहेत. कोरोनामुळे स्थलांतरित मजुरांना गावापासून हजारो किलोमीटर दूरवर त्यांना शासनाने क्वारटाईन केले आहे. त्यामुळे ते त्याच ठिकाणी अडकून पडले आहे. पण, आता अमरावतीच्या तिवसामधील या चिमुरड्याच्या निरागस चेहऱ्यावरील हे हास्य लॉकडाऊनमध्ये क्वारंटाईन झालेल्या लोकांसाठी आशादायी ठरणार आहे.
लॉकडाऊनमध्ये साजरा केला वाढदिवस अमरावतीच्या तिवसा शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीतील व्हरांड्यात चेहऱ्यावर हास्य घेऊन धावणारा हा आहे. एक वर्षाचा चिमुरडा सौरभ आज त्याचा पहिला वाढदिवस, बापालाही वाटलं की लेकराचा वाढदिवस मोठया धुमधडाक्यात साजरा करावा. पण, लॉकडाऊनमुळे शक्य नव्हते. याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांच्या पुढाकाराने चिमुकल्या 1 वर्षाच्या सौरभचा वाढदिवस चार राज्यातील लोकांच्या साक्षीने पार पडला.
एकीकडे लॉकडाऊनमुळे राज्यभरात ठिकठिकाणी हजारो लोक शासकीय निवाऱ्यात क्वारंटाईन केलेले आहेत. पण आपल इथं कुणीच नाही, त्यात देशात लॉकडाऊन वाढणार या बातम्या झळकणे सुरू झाल्याने आता आणखी किती दिवस काढायचे, असा प्रश्न या लोकांना पडला. असे असतानाच कर्तव्यासोबत माणुसकी जपणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे गावापासून ८०० किलोमीटरवर असलेली अनोळखी माणसही आपली झाल्याचा प्रत्यय या लोकांना आला.
राज यादव आणि त्याची पत्नी रेणू यादव मूळचे उत्तरप्रदेश मधील अलाहाबादचे. पण कामानिमित्त पुण्याला राहायचे. गावी परत जात असताना बारा दिवसापासून हे कुटुंब येथेच अडकले आहे. शनिवारी त्यांचा मुलगा सौरभ या पहिला वाढदिवस होता. लेकराचा पहिला वाढदिवस थाटात करण्याचे स्वप्न रंगवलेल्या बापाच्या स्वप्नाला कोरोनाने मात्र लॉकडाऊन केले. मात्र, ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करून बापाच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. गावापासून हजारो किलोमीटरवर अनोळखी व्यक्तीच्या पुढाकाराने झालेला मुलाचा पहिला वाढदिवस हे कुटुंब कधीच विसरणार नाही. या अधिकाऱ्यांनी दिलेलं प्रेम आणि आपुलकी याची परतफेड कशी करणार, या भावनेने या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू झळकत होते.