अमरावती -नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आज बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदचे पडसाद अमरावतीमध्येही उमटले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ सकाळी सुरू झाली. मात्र, शहरातील इतवारा बाजार, पठाण चौक, चित्रा चौक परिसर जमावाने बंद केला आहे. इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बंद समर्थक मोठ्या संख्येने एकत्रित येत आहेत.
भारत बंद : अमरावतीमध्ये मुख्य बाजारपेठ सुरू; मात्र इर्विन चौकात जमाव - NRC
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, अमरावती शहरामध्ये मुख्य बाजारपेठ सुरू आहे.
शुक्रवारी (२४ जानेवारी) ला वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद दरम्यान अमरावती शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आजही कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील सर्व मुख्य चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चित्रा चौक परिसरातून मोठा जमाव इर्विन चौकाच्या दिशेने निघाला. तसेच या जमावातील काहींनी बंद पाळण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले.
दरम्यान पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच शहरात दंगा नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे.