अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील महाविद्यालयात पे फिक्सेशन बाबत विचारणा करायला गेलेल्या एका प्राध्यपकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे नेहमीच विविध गोष्टींवरून चर्चेत असलेले चांदूर रेल्वे येथील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालय (अशोक महाविद्यालय) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.
चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात प्राध्यापकाला मारहाण; गुन्हा दाखल
अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयात एका प्राध्यपकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात 2 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तपोविन नामदेवराव पाटील कार्यरत आहेत. ते मस्टरवर सही करण्यासाठी गेले. सही केल्यानंतर प्राचार्य यांच्या कक्षाबाहेर पे फिक्सेशन बाबत विचारणा करण्याकरिता थांबले असता सदर महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मामा संजय धुर्वे यांनी तु इथे का थांबला बाहेर निघ, असे म्हणून गालावर थापड मारली आणि त्यांना शिवीगाळ केली.
हेही वाचा -निर्भया प्रकरणी धक्कादायक खुलासा! त्या क्रुर रात्रीची कहानी सांगण्यासाठी मित्रानेच उकळले लाखो रुपये
तर दुसरे गैरअर्जदार कार्यालय अधीक्षक गजानन रामराव कैकाडे यांनी पुन्हा इथे आला तर तुला बघून घेईल अशी धमकी देऊन दोघांनी प्रा. पाटील यांना ढकलून दिले, अशा आशयाची तक्रार अर्जदार प्रा. तपोविन पाटील यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.