अमरावती:बहावा हे निसर्गातील अतिशय सुंदर वृक्ष आहे. संस्कृतमध्ये या वृक्षाला 'आरग्वध' असे म्हणतात. तर हे झाड हिंदीमध्ये 'अमलतास' या नावाने सर्वत्र ओळखल्या जाते. रखरखत्या उन्हात पाहणाऱ्याला अगदी वेड लागेल अशा पिवळ्या धम्म रंगामुळे या वृक्षाला 'गोल्डन शॉवर ट्री' या नावाने देखील ओळखले जाते. हे वृक्ष साधारणतः 25 ते 30 फूट उंच वाढते. हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होऊन संपूर्ण झाडावर फक्त नळीदार काळ्या शेंगा दिसतात. उन्हाळ्यात या वृक्षाचे सौंदर्य बघण्यासारखे असते. याला झुबकेदार खाली लोमणारे फुलोरे येतात. कानात घालणारे अलंकारसुद्धा झुपकेदार असल्याने या वृक्षाला 'कर्णीकार' नावाने देखील ओळखले जाते.
अन्नसाखळीत आहे महत्त्व:बहावा या झाडाच्या फुलांना कडसर मंद मात्र हवाहवासा असा सुगंध येतो. शिवाय या फुलांमध्ये मुबलक पुष्परस असल्याने विविध भुंगे आणि कीटक या वृक्षाच्या फुलांभोवती पिंगा घालतात. कीटकांमुळे पक्षांचेसुद्धा हे आवडीचे वृक्ष आहे. यामुळे हे वृक्ष अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
'या' आजारांवर होतो उपचार:बहावा हे संपूर्ण वृक्ष मानवासह प्राण्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या वृक्षांना येणाऱ्या बियांचे चूर्ण हे चर्मरोगावर रामबाण इलाज आहे. तसेच मधुमेहावर देखील या वृक्षांच्या बियांचे चूर्ण उत्तम औषध आहे. या वृक्षाची साल घशातील, गाठीसाठी उपयुक्त असते. या वृक्षाच्या गराचा लेप हा वातरक्त आणि आमवातमध्ये अतिशय गुणकारी आहे. यासह संधिवात, पित्तप्रकोप, हृदयरोग, उदरशुळ, गर्भपातन, संधिवात, पक्षाघात यामध्ये या वृक्षांची पाने, फुले, फळे, बिया, मूळ सारे काही उपयुक्त आहे. मेळघाटात या वृक्षांची फुले सुकवून त्याचा मुरब्बा केला जातो. हा मुरब्बा दोन-तीन वर्षे टिकतो.