अमरावती - दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, भाजपाने नुसते आंदोलन न करता केंद्राकडूनही निधी आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच मी सुद्धा दूध आंदोलक शेतकऱ्यांसोबत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू. परंतु, यामध्ये केंद्र सरकारचा ही खारीचा वाटा असला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारनेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच नाही तर कमीत कमी दोन रुपये तरी अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये असेही ते म्हणाले. तसेच मागील वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असतानाही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळेस दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. आता भाजपा राजकारण म्हणून केवळ आंदोलन करत असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.