अमरावती Arewadi Festival Amravati:बाभूळीच्या काट्यांची भली मोठी गंजी करून त्यावर उघड्या अंगाने उड्या मारणे, तसेच बाभळीच्या वाळलेल्या फांद्यांवरील टोकदार काटे अंगात खुपसून ते काटे अंगावर मोडतात. गावातील लहान मुलं, तरुण मोठ्या संख्येने आपल्या अंगावर काटे मोडतात. हा संपूर्ण प्रकार सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या अनेक गावात असणाऱ्या मानकर जमातीमध्ये बऱ्याच काळापासून रूढी परंपरा सुरू आहे.
असा आहे अयरवाडी उत्सव: पांडवांचे वंशज असल्याचा दावा मानकर जमातीकडून केला जातो. पितामहा भीष्मांना मानकर जमातीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. पितामहा भीष्माचे प्रतीक म्हणून ज्या भागात मानकर समाज आहे, त्याठिकाणी वस्तीमध्ये एका ओट्यावर बिवसान देव स्थापन केलेला असतो. दगडाला शेंदूर लावून स्थापन करण्यात आलेल्या बिवसान देवाला बिवसान बुवा, बिवसात बली असं देखील म्हणतात. अयरवाडी सणाच्या परवावर बिवसान देवाची बहीण मोठीमाय, बोंडामाय तसेच नाय देव चौराई आणि सोमाबाई या देवी-देवतांची पूजा करतात. मानकर जमात असणाऱ्या गावांमध्ये बिवसान बुवा आणि चौराईची स्थापना केलेली दिसते. इतर सर्व देव हे गावाच्या शिवाराबाहेर स्थापन करण्यात आले आहेत. सणाच्या पहिल्या दिवशी बोंडा माय आणि नाय देवाचे लग्न लावले जाते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बिवसान देव वरातीमध्ये नवरदेवाच्या घरी जातो. तेव्हा जेवणाच्या पंगतीत त्याला नवरदेवाची बहिणीला पाहून बिवसान देव मोहित होतो असं म्हटलं जातं. त्यामुळं अयरवाडी सणाच्या दुसऱ्या दिवशी मानकर जमातीमधील महिला गीत गाऊन आनंद साजरा करतात अशी माहिती, धामणगाव गढी येथील रहिवासी कैलास निर्मळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलीय.
अशी आहे काटेमोडची प्रथा : अयरवाडी सणानिमित्त पहिल्या दिवशी बोंडा माय आणि नाय देवाचे लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशीपासून काटे मोड केली जाते. मानकर समाज पितामहा भीष्म यांनी ज्याप्रमाणे महाभारताचे युद्ध सुरू असताना, 18 दिवस टोकदार बाणाच्या शय्येवर पडले होते. त्यावेळी त्यांना झालेला वेदना समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या अंगावर काटे मोडून घेण्याची प्रथा मानकर जमातीमध्ये आहे. काटे मोड करणाऱ्या व्यक्तीला 'इराय' असं म्हणतात. हा 'इराय' दिवसभर उपवास करतो. जंगलातून बाभळीच्या काट्यांच्या फांद्या तोडून बिवसं देवाच्या समोर असलेल्या पटांगणात हळदीकुंकू लावून आणून ठेवतात. सायंकाळी चंद्र दिसल्यावर समाजाचा पाटील काट्यांच्या ह्या गंजीचे पूजन करतात. यानंतर इराय कडव्याच्या पेंडीवर गार पाण्याने आंघोळ करून दिवसा देवाच्या मंदिरासमोर येतो. यावेळी ढोल ताशांचा प्रचंड नाद करण्यात येतो. या सर्व जल्लोषात 'इराय' बाभळीच्या सुकल्या काट्यांच्या फांद्या आपल्या अंगावर घेऊन नाचतो आणि त्यानंतर पाठीत, पोटात या फांद्यांवरील टोकदार काटे अंगात खूपसून ते काटे मोडतो. अनेकदा हा इराय चक्क काट्याच्या गंजीवर जाऊन झेप घेऊन लोळतात आणि काटे मोडण्याचा प्रयत्न करतो. काटेमोड करताना जखमी होणाऱ्या इराईला भिवसनबुवासमोर ठेवलेली हळद लावली जाते. अंगावर अशी हळद लागण्यास मानकर समाजात मोठा मान आहे, हा संपूर्ण थरारक प्रकार पाहण्यासाठी समाजातील सर्व मंडळी एकत्रित येतात.
काटे मोड केल्यावर लग्न उत्सव: मोडलेल्या काट्यांच्या ढिगार्याला खोपडी असं म्हणतात. या काट्याच्या गंजीवर पश्चिमेकडे तुराट्याच्या दोन पेंढ्या ठेवून त्यावर लहान मुलगा आणि लहान मुलीला नवरदेव - नवरी सारखे सजवून बसवतात. त्यांचं नाय देव आणि बोंडा माय यांचं प्रतीकात्मक लग्न लावलं जातं. नवरदेव बनलेला मुलगा हा नायदेवाच्या कुळातीलच असतो.