अमरावती - एटीएम मशिनमधून २८ हजार रुपये काढताना २७ हजार ५०० रुपयेच बाहेर आलेत. विशेष म्हणजे या रकमेसोबत एक पांढऱ्या रंगाचा कागदही बाहेर आला. ५०० रुपये कमी आले असताना सोबत ५०० रुपयाच्या नोटेच्या आकाराची एलआयसीची पावती हाती लागल्याने एका व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला. गर्ल्स हायस्कुल चौक येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये आज हा धक्कादायक प्रकार घडला.
एटीएम मशिनमधून निघाली ५०० रुपयाच्या नोटेच्या आकारातील एलआयसीची पावती!
गर्ल्स हायस्कुल चौक येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये आज हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारबाबत मंगेश घुटे यांनी गुलशन टॉवर स्थित एक्सिस बँकेत तक्रार दिली आहे.
अर्जुन नगर येथील प्रिया टाऊनशीप येथील रहिवासी मंगेश अनंत घुटे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गर्ल्स हायस्कुल चौक येथील एटीएम मशिनमधून पैसे काढायला गेले होते. घुटे यांनी आधी २० हजार रुपये काढले. त्यानंतर ८ हजार रुपये काढले असता ५०० च्या नोटांसोबत पांढऱ्या रंगाचा कागदही बाहेर आला. घुटे यांनी पैसे मोजले तेव्हा ५०० च्या १६ ऐवजी केवळ १५ नोटा मशिनमधून बाहेर आल्या. आणि या नोटांसोबत एक ५०० च्या नोटेच्या आकाराची एलआयसीची पावती मशीन मधून त्यांना मिळाली. ५०० रुपयांच्या नोटांसोबत मिळालेली एलआयसीची पावती त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यापुढे दाखवली. या प्रकारबाबत घुटे यांनी गुलशन टॉवर स्थित एक्सिस बँकेत तक्रार दिली आहे.