अमरावती - तिवसा तालुक्यासाठी मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय ऐन वेळी रद्द केल्याने अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे. रविवारी रात्री १२ वाजता धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येणार होते. मात्र पाणी सोडण्याच्या काही तासांपूर्वी प्रशासनाने अचानक आपला निर्णय रद्द केला. या निर्णयामुळे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे आमदार अनिल बोंडे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.
जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवसा तालुक्यात वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होतो, परंतु वर्धा नदीचे पाणी आटल्याने येथे दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. पाण्यासाठी होत असलेली वणवण थांबण्यासाठी जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार आज रविवारी रात्री 12 अप्पर वर्धा धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येणार होते. तसा आदेश अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता मात्र अचानक रविवारी अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याच्या काही तासांवर अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने रद्द केला. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी सकाळी अप्पर वर्धा धरणात शेकडो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. तर धरणातून पाणी सोडण्याबाबत उद्या बैठक असल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु पाणी सोडण्यावरून अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
दोन वर्षांपासून जिल्हात कमी पाऊस झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न यंदा गंभीर झाला आहे. वर्धा नदी पात्रातील पाणी पूर्णपणे आटल्याने दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. वर्धा नदी पात्रातून तिवसा,मोर्शी, धामणगाव रेल्वे तालुक्याला पाणी पुरवठा होतो मात्र नदी पात्रातील पाणी संपल्याने दुष्काळ निर्माण झाला होता. त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजता अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता. नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र ऐन पाणी सोडण्याच्या काही तासांपूर्वी रात्री 9 वाजता अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे यावर आता राजकारण चांगलेच तापले असून सोमवारी सकाळपर्यंत पाणी न सोडल्यास आपण स्वतः शेकडो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.