अमरावती- जगात सर्वात कोरोनामुळे हाहाकार उडाला असताना अंजनगाव सुर्जीचे ग्रामीण रुग्णालय मात्र याबाबत संवेदनशील नसल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासन घेत नसल्याचे आज आढळून आले.
अंजनगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मध्येच ज्या ठिकाणी रक्त आणि एक्स-रेची तपासणी होते त्या भिंतीच्या मागे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि सर्वत्र गाजर गवत वाढलेले दिसले. रुग्णांना हात धुण्यासाठी बाहेर कोणती ही व्यवस्था केली नाही, साधा साबण सुद्धा आज ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हता.परगावावरून जे लोक येत आहेत त्यांची नोंद सुरू आहे. परंतु, दोन रुग्णांमधील अंतराचे कोणते ही नियम पाळलेले पाहण्यास मिळाली नाही.
परगावाहून आलेल्या लोकांची जवळजवळ एकच रांग तयार करण्यात आली होती. रुग्णांना तपासण्याआधीच ग्रामीण रुग्णालयातील एक कर्मचारी रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या हातावर शिक्के मारत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी रुग्णालयाच्या आतमध्ये न करता भर उन्हात रुग्णांच्या रांगा लावून तपासणी करण्यात येत होती. उन्हापासून सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर कोणताही शामियाना टाकण्यात आलेला नव्हता. हा सर्व प्रकार तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी सुद्धा पाहिला, त्यांनी संबंधितांना काही सूचना दिल्या आणि ते निघून गेले.
सदर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या रिक्त असून याकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. एकीकडे सरकार कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात काळजी घेत असताना दुसरीकडे अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय याबाबत अधिक संवेदनशील नसल्याचे चित्र दिसून आले.