अमरावती : कठोरा मार्गावर असणाऱ्या हॉलिवूड कॉलनी येथील ६५ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला दोन मुली असून, त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न विक्रम दुबे याच्याशी झाले होते. दरम्यान, आपणास आयटी कंपनी स्थापन करायचा मानस त्याने अमरावतीकर सासऱ्यांकडे व्यक्त केला. तुम्ही पम या कंपनीच्या संचालक असाल, असा शब्द त्याने दिला. त्यासाठी जावई विक्रमने सासऱ्यांकडे मोठ्या रकमेची मागणी केली.
एफडी तोडून जावयाला एक लाख रुपये दिले : गुंतवणुकीचा परतावा आपण वाटून घेऊ, अशी बतावणी त्याने केली. दरम्यान विक्रम दुबे याने 1 जुलै 2015 रोजी कंपनीची नोंदणी केली. मात्र नोंदणी दस्तावेजात सासऱ्याचे नाव कुठेही समाविष्ट केले नाही. दरम्यान ती आयटी कंपनी अमरावतीत उभारू, त्यासाठी 130 एकर जमीन अमरावती एमआयडीसीमध्ये बघा, अशी विनंती केली. सासऱ्यांना त्याने विश्वासात घेतले. मे 2015 मध्ये तक्रारकर्त्या सासऱ्यांनी एफडी तोडून जावयाला एक लाख रुपये दिले, तर पगारातूनदेखील १४ हजार ५०० रुपये दिले.
स्वत:च्या खात्यात वळती केले : ते निवृत्त झाल्यानंतर आरोपीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधून 11 लाख 85 हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळती केले. त्यानंतर वेळोवेळी आरोपीने सासऱ्याच्या खात्यातून 5 लाख, 2.22 लाख, 28.35 लाख, 68.28 लाख व 16 लाख 60 हजार असे एकूण 1 कोटी 48 लाख 53 हजार 696 रुपये स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करवून घेतले.