अमरावती Amravati Shiv Mahapuran Katha : अमरावती जिल्हा सहलगतच्या सर्व जिल्ह्यातून प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं जास्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच रोज 120 एसटी बस शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं प्रवाशांच्या सुविधेसाठी धावत होत्या. अशा 14 तालुक्यांमध्ये रोज 40 ते 42 गाड्या धावल्या. एकूणच शिवमहापुराण कथेच्या पाच दिवसात एसटी महामंडळाला 20 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कथा संपल्यावर बस स्थानकावर प्रचंड गर्दी :16 ते 20 डिसेंबर दरम्यान शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी अमरावती जिल्ह्यासह लगतच्या सर्व जिल्ह्यातून हजारो लोक एसटी बसद्वारे अमरावतीला आले. 20 डिसेंबरला सकाळी 11 वाजता कथा समाप्तीनंतर दुपारी दोन वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासह राजापेठ बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे बस स्थानकावरील गर्दी आवरण्यासाठी महामंडळाच्या खासगी सुरक्षा रक्षकांसह पोलिसांना देखील धावून यावं लागलं.