अमरावती Amravati Crime : घराच्या अंगणात गप्पागोष्टी करणाऱ्या एका कुटुंबाला कारनं चिरडल्यानं तीन जण ठार झाले आहेत. ही धक्कादायक घटना दर्यापूर तालुक्यातील नचोना या गावात मंगळवारी रात्री घडली. शामराव लालूजी अंभोरे (70 ) अनुसया शामराव अंभोरे (67) आणि अनारकली मोहन गुजर ( 43) अशी या घटनेत ठार झालेल्या तिघांची नावं आहेत.
अंगणात बसलेल्या कुटुंबाला कारनं चिरडलं घराबाहेर गप्पा करताना कारनं चिरडलं :मंगळवारी रात्री अंगणात बसलेलं अंभोरे कुटुंब चांगलंच गप्पात रंगलं होतं. मात्र रात्री आठ वाजताच्या सुमारास गावातीलच एका व्यक्तीनं आपली कार अंभोरे कुटुंबीयांच्या अंगणातून भरधाव नेली. यावेळी कारनं अंभोरे कुटुंबीयांतील 5 जणांना चिरडलं. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन जण गंभीर जखमी :हादरवून सोडणाऱ्या या घटनेत शारदा उमेश अंभोरे ( 40 ) आणि किशोर शामराव अंभोरे ( 38 ) हे दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री हलवण्यात आलं. या घटनेमुळे नाचोना गावात खळबळ उडाली आहे.
पाच जणांना चिरडून आरोपी फरार :या गंभीर घटनेनंतर आरोपी आपलं वाहन अंभोरे यांच्या अंगणात सोडून फरार झाला आहे. दरम्यान खल्लार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मेसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस रात्री घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचं म्हटलं असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला अटक :जुन्या वैमान्यातून शेजारी राहणाऱ्या अंभोरे कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर भरधाव वेगानं कार घेऊन येणाऱ्या चंदन गुजर या आरोपीस अटक केली आहे. याची माहिती खल्लार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेसरे यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असल्याचे देखील पोलीस निरीक्षक चंद्रकला मेसरे यांनी सांगितले.
असे आहे संपूर्ण प्रकरण -नाचोना गावातील रहिवासी किशोर शामराव अंभोरे हे चिकनचे दुकान बंद करून घरी परत जात असताना त्यांच्या शेजारी राहणारा चंदन गुजर याने किशोर अंभोरे याला रस्त्यात अडवून तुझ्या कुत्र्याने आमची कोंबडी पकडली यावरून वाद घातला. यावेळी किशोर अंभोरे याने तो कुत्रा माझा नाही असे म्हणून चंदनची समजूत काढत त्याला घरी जाण्यास सांगितले. मात्र चंदन गुजर याने किशोरला शिवीगाळ करतात किशोरने चंदनला दोन थोबाडीत मारल्या. दोघांमध्ये वाद सुरू असताना चंदनचे वडील राधेश्याम गुजर हे किशोर अंभोरेच्या अंगावर कुऱ्हा घेऊन धावून आले. या भांडणाचा आवाज ऐकून किशोरचे वडील शामराव अंभोरे आई अनुसया अंभोरे भाऊ उमेश अंभोरे वहिनी शारदा अंभोरे आणि बहिण सुमित्रा चव्हाण हे भांडण सोडविण्यासाठी धावून आलेत. यानंतर अंभोरे कुटुंबीयांनी किशोरला घरात नेले. किशोरला घरात मेल्यावर अंभोरे कुटुंब घराच्या अंगणात बसले असताना चंदन गुजर याने त्याची कार भर वेगात अंभोरे यांच्या अंगणात नेली आणि गाडीने शामराव अंभोरे आणि अनुसया अंभोरे यांना धडक दिली. यावेळी या दोन्ही वृद्धांना वाचवण्यासाठी उमेश अंभोरे शारदा आणि सुमित्रा तसेच शेजारी राहणारी अनारकली गुजर हे धावून गेले असता चंदनने पुन्हा सुसाट वेगाने या सर्वांच्या अंगावर गाडी चढवली. या घटनेत शामराव अंभोरे अनुसया आंबोरे आणि अनारकली गुजर हे घटनास्थळीच ठार झाले. तर शारदा अंभोरे उमेश आंबोरे आणि किशोर अंभोरे गंभीर जखमी झाले.
हेही वाचा :
- पावसानं केला घात अन् झाला अपघात; कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
- लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात सहा जण ठार, एक गंभीर
- ओव्हरटेक करताना धावत्या कारवर कोसळला ट्रक; भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू