अमरावती - महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाचे संकट पूर्णतः टळल्याशिवाय अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी येणार नाही, अशी परिस्थिती आहे. खरंतर 26 जूनला दरवर्षी अमरावती शहरातील प्रत्येक शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी पाहायला मिळते. शाळेच्या नव्या युनिफॉर्ममध्ये टवटवीत चेहऱ्यांचे विद्यार्थी अगदी आनंदात शाळेत येताना दिसतात. मात्र, यंदा 26 जूनला शाळा सुरू झाल्या खऱ्या मात्र त्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविनाच.
दोन महिन्याच्या सुट्ट्यानंतर एकत्र येणाऱ्या मित्रांची मज्जा काही औरच अनुभवायला मिळते. नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला प्रत्येक शाळांमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. अनेक शाळांमध्ये या स्वागत सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मान्यवरांना बोलविले जाते. विद्यार्थ्यां सोबतच शिक्षकांमध्ये ही नवा उत्साह पाहायला मिळतो. कोरोनामुळे मात्र शाळेचा पहिला दिवस यावर्षी पहिल्यांदा निरुत्साही असल्याचे अमरावती शहरातील शाळांसमोर पहायला मिळाले. कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शाळा कधी उघडणार हे अनिश्चित आहे.