अमरावती-कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी लॉकडाऊनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा सीमेवरून प्रवेश करणा-या वाहनांना प्रतिबंध करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना, तर अमरावती शहरामध्ये प्रवेश करणा-या प्रतिबंध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत.
किराणा, दूध, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 ही वेळ यापूर्वीच निश्चित करून देण्यात आली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सदर वेळेत सुरु राहतील. सर्व प्रकारची औषधी दुकाने व रूग्णालये सुरु राहतील. आदेशानुसार, मागील पारित केलेल्या संचारबंदीच्या आदेशातील मुद्दे व सूचना तशाच कायम ठेवण्यात आल्या आहेत. अमरावती शहर व अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, साप्ताहिक बाजार, जनावरांचे बाजार, उत्सव, जत्रा आदी बंद ठेवण्यात येतील.
अमरावती शहर व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँका, खासगी बँक, सहकारी संस्था, पतपेढी संस्था व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तीय संस्था यांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 अशी राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडील सायन्सस्कोर मैदान, दसरा मैदान, भाजीबाजार येथील भाजीपाला व फळ यार्ड 17 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.