अमरावती- राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती आगारात अनेक बसेसची अवस्था खराब झाली आहे. गाड्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक मार्गांवरील गाड्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. शिवाय सेवेवर रुजू होणाऱ्या चालक-वाहकांना चक्क घरी पाठवून आणि त्यांचे वेतन कापून त्यांच्यावर अन्याय करण्याचा अजब प्रकारही येथे पहायला मिळत आहे.
आगारातील बसेसच्या दुरवस्थेचे परिस्थिती चालकांनी मांडली हेही वाचा - अमरावती विधानसभा आढावा : आमदार डॉ. सुनील देशमुख यांना कोण आव्हान देणार?
अमरावती मध्यवर्ती बसस्थानक हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बसस्थानक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागापासून तर राज्यातील अनेक शहरापर्यंत तसेच मध्यप्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यातही अमरावती बस स्थानकावरून गाड्या जातात. सद्यस्थितीत अमरावती आगारातील अनेक गाड्यांची स्थिती भंगारासारखी झाली आहे. काही गाड्यांच्या खिडकींच्या काचा फुटल्या असून चालकांच्या समोरच्या काचाही फुटल्या आहेत. ड्रायव्हरच्या केबिनच्या खिडक्याही तुटल्या आहेत. अमरावती ते हैदराबाद या लांब पल्यावर धावणाऱ्या शिवशाही बसचे चाक फाटले असतानाही ही गाडी रस्त्यावर धावत आहे. हा संपूर्ण प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा असल्याची तक्रार चालक आणि वाहक यांनी केली आहे. मात्र, याही अवस्थेतील गाड्या तुम्हाला चालवायला लागतील असे अधिकारी चालकांना सांगितले जाते.
काही चालक आणि वाहकांनी 'ईटीव्ही भारत'शी येथील दैनावस्था सांगितली. ते म्हणाले की, अनेकदा आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून आगारात सेवेवर रुजू होतो. मात्र, गाड्याच उपलब्ध नसल्याचे कारण सांगून आम्हाला जबरदस्तीने सुटी घ्यायला लावली जाते. त्यामुळे आमचे वेतन कापण्याचा प्रकार येथे सुरू आहे. अमरावती आगारात 130 चालक आणि 140 वाहक आहेत. आगारातील अनेक गाड्या खराब असल्यामुळे गाड्या उपलब्ध नसल्याचे कारण सांगून दररोज पंधरा ते वीस वाहनचालकांना घरी पाठवण्यात येते. नियमानुसार आम्ही सेवेवर रुजू झालो असल्याने आम्हाला वेतन द्यावे लागते. असे असले तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आमच्या वेतनात कपात करीत असल्याबाबतचा रोषही वाहक आणि चालक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षापासून अमरावती आगारात एकही नवीन गाडी आलेली नाही. जुन्या आणि भंगार अवस्थेतील गाड्या आम्ही चालवाव्यात. मात्र, यामुळे अपघात होण्याची शक्यता असून कुठलीही अप्रिय घटना घडली तर आगार कोणत्याही क्षणी बंद होण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही चालक-वाहक संघटनेने दिला आहे.