अमरावती: माहितीप्रमाणे, राणा दाम्पत्याच्या सांगण्यावरून भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्यावर काही महिला कार्यकर्त्यांनी खोटी तक्रार दिली. त्या तक्रारीची पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला. १ मे पर्यंत गुन्हे मागे न घेतल्यास विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून २ मे रोजी जिल्हा कचेरीवर धिक्कार मोर्चा काढला जाईल. यामध्ये जिल्हाभरातून ३० ते ३५ हजार भीम अनुयायी सहभागी होणार असल्याचे बसपाचे शहराध्यक्ष सुदाम बोरकर पत्रपरिषदेत सांगितले.
काय होता घटनाक्रम? १४ एप्रिलला राणा दाम्पत्य डॉ. आंबेडकर चौकातील भीमजयंती कार्यक्रमस्थळी आले असता काही भीमसैनिकांनी 'कोण आले रे, कोण आले, भाजपचे दलाल आले', अशा घोषणा दिल्या. मुळात घोषणाबाजी करणाऱ्यांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल करायला हवे होते; मात्र राणा दाम्पत्याच्या सांगण्यावरून त्यांचा कार्यकर्ता विनोद गुहे हा तीन महिलांना गाडगेनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्या महिलांनी खोटी तक्रार देऊन भीमसैनिकांवर हेतूपुरस्सरपणे विनयभंगाचा खोटा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील १३ व १४ एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तक्रारीत नमूद घटना घडलीच नाही. खोटी तक्रार दाखल करणाऱ्या राणा दाम्पत्याच्या त्या महिला कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'जय संविधान' संघटनेचे समन्वयक किरण गुडघे यांनी यावेळी केली.