अमरावती- दर्यापूर तालुक्याच्या इटकी गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावात मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत नागरिकांनी याबाबत दर्यापूर तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
अमरावतीच्या इटकी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार - लोकसभा
इटकी गावात मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत नागरिकांनी याबाबत दर्यापूर तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. गावातील आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांचे सुद्धा यादरम्यान शैक्षणिक नुकसान होते.
इटकी गावाजवळील गणेश नाला व मासोळी नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाल्यावरील पूल जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात इटकीपासून दर्यापूर अंजनगाव रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरुन प्रवास करणे ग्रामस्थांना कठीण जाते. या गावातील नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यास गावाकऱ्यांचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. गावातील आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांचे सुद्धा यादरम्यान शैक्षणिक नुकसान होते. या दोन्ही पुलाचे काम करण्यासाठी तसेच सांगळुद ते इटकी रस्त्याचे खडीकरण व गावातील स्मशान भूमीचा रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावकऱ्यांनी अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदने दिली. तरीही इटकीतील ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही.
लोकप्रतिनिधींनी सुद्धा गावाच्या या ज्वलंत समस्येवर लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. भौतिक व मुलभूत सुविधापासून रहिवासी वंचित असल्याची भावना व्यक्त करीत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून गावकऱ्यांनी दिला आहे .