अमरावती -जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, येथे विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी जो काही प्रकार शासनाच्या वतीने केला गेला. त्या प्रकरणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन अमरावती शाखेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. काल गुरुवारी याबाबत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना एआयएसएफच्या वतीने सादर करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे शुल्क वाढीबाबत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी शुल्क वाढीचा विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. ही निंदनीय बाब असून विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी एआयएसएफने आपल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.