अमरावती- तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन दुचाकीस्वारांनी वकिलाच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री गर्ल्स हायस्कूल चौक ते मालटेकडी दरम्यान घडली. या हल्ल्यात कारच्या काचेला तडा गेला असून समोरची एक लाईट फुटली आहे. अॅड. राजेश मुंदडा यांच्या वाहनावर हा हल्ला झाला आहे.
सोमवारी धुळवडीच्या दिवशी रात्रीच्या वेळी वकील राजेश मुंदडा हे गाडगे नगर येथून घरी जात होते. दरम्यान, गर्ल्स हायस्कूल चौकात त्यांच्या विरुद्ध दिशेने एक दुचाकी भरधाव वेगात आली. दुचाकीवर चेहऱ्याला कापड बांधलेले दोघेजण स्वार होते. या दुचाकीस्वारांनी राजेश मुंदडा यांच्या कारच्या काचेवर रॉड मारला. यानंतर राजेश मुंदडा यांनी कारचा वेग कमी केला असता, दुचाकीस्वार कारच्या दुसऱ्या बाजूने आले आणि त्यांनी परत रॉडने वार करून कारचा समोरचा लाईट फोडला. दरम्यान, राजेश मुंदडा यांनी कारचा वेग वाढवला आणि ते थेट पोलीस आयुक्तालय समोरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले. अॅड. राजेश मुंदडा हे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळे दुचाकीस्वारांनी पळ काढला.