महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेत्री ते खासदार.. असा आहे नवनीत राणा यांचा प्रवास, 'मोची' की 'लुभाणा' सर्वोच्च न्यायालय ठरवणार - खासदार नवनीत राणा

अनुसूचीत जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि नेहमी चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट होताच नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

mp-navneet-ranas-journey
mp-navneet-ranas-journey

By

Published : Jun 9, 2021, 7:21 PM IST

Updated : Jun 10, 2021, 3:18 PM IST

अमरावती - अनुसूचीत जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि नेहमी चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट होताच नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वास्तविक पाहता त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असून त्या अनुसूचित जातीत मोडत नसल्याचा विषय 2014 च्या लोकसभा निवडणुकीतच अमरावतीकरांसमोर आला होता. मात्र या विषयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री ते खासदार.. नवनीत राणा यांचा प्रवास

दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून नवनीत राणा यांची पहिली ओळख -

3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या लग्नापूर्वीच्या नवनीत कौर यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आणि त्यानंतर त्या मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला काही म्युझिक अलबममध्ये झळकल्यावर त्यांना 2002 मध्ये ' दर्शन' या कन्नड भाषेतील चित्रपट पहिली भूमिका मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये त्या तेलुगू चित्रपटसृष्टीत वळल्या. सीनू, वसंती लक्ष्मी, 2005 मध्ये चेतना, 2005 मध्ये जगपाथी, गुड बॉय, 2008 मध्ये भूमा हे चित्रपट त्यांनी केले. तेलुगू दुरचित्रवाहिनीवर त्यांनी रिअॅलिटी शो केले. 2010 मध्ये अभिनेता गुरूप्रित गुग्गी यांच्यासोबत पंजाबी चित्रपटातही त्या झळकल्या.

नवनीत राणा यांचा संग्रहित फोटो

2011 मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी केले लग्न -

नवनीत कौर या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत. बाबा रामदेव यांच्याकडे नेहेमी जात असताना त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली. बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचे ठरविले. 2010 च्या दिवाळीत नवनीत कौर पहिल्यांदा अमरावतीला आल्या. त्यांनी आमदार रवी राणा यांच्यासह अमरावतीच्या कुलदेवता श्री अंबा आणि श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले आणि तेव्हाच नवनीत राणा अमरावतीच्या सून होणार हे अमरावतीकरांना कळले. 3 फेब्रुवारी 2011 रोजी आमदार रवी राणा आणि नवनीत कौर यांनी अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर 2,100 जोडप्यांसह सामूहिक विवाहात दांपत्य जीवनाला सुरुवात केली.

नवनीत राणा यांचा संग्रहित फोटो

2014 मध्ये लढवली लोकसभा निवडणूक -

2009 च्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघात राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांचा पराभव करून आमदार झालेले रवी राणा यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा उमेदवार असणार असे 2011 मध्ये लग्न होताच जाहीर केले होते. नवनीत राणा यांची क्रेझ पाहता अमरावतीचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ सावध झाले होते. आमदार रवी राणा हे इतर मागासवर्गीय घटकात मोडणाऱ्या पोवार समाजाचे आहेत मात्र नवनीत राणा या माहेरच्या मोची समाजाच्या असल्याचे सांगण्यात आले. नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित होणार असल्याने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून नवनीत राणा यांना प्रखर विरोध केला आणि आनंदराव अडसूळ यांना पाठिंबा दिला होता. 2014 च्या लोकसभा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होताच आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेसनेही नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र सिनेअभिनेत्री म्हणून अमरावतीकरांमध्ये नवनीत राणा यांची प्रचंड क्रेझ होती. मेळघाटसारख्या आदिवासी भागातही नवनीत राणा यांचा माहोल होता. असे असताना शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा 1 लाख 37 हजार 932 मतांनी पराभव केला होता.

नवनीत राणा यांचा संग्रहित फोटो

शिवसेनेकडून प्रचंड बदनामी -

2014 च्या निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र बोगस आल्याची तक्रार देऊनही निवडणुक रिंगणात आनंद अडसूळ यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या नवनीत राणा यांची प्रचंड बदनामी करण्याचा प्रकार शिवसैनिकांनी केला होता. नवनीत राणा यांचे सिनेसृष्टीत काम करताना असणारी अश्लील छायाचित्र, चित्रफिती मोठ्या प्रमाणात व्हायरल करणे, त्यावर आधारीत विनोद सर्वत्र पसरविणे असा प्रकार विरोधकांकडून होत असल्याने अनेकदा हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता.

पाच वर्षे चघळला विषय -

2014 च्या निवडणुकीत डोकेदुःखी ठरणाऱ्या नवनीत राणा 2019 मध्येही त्रासदायक ठरणार याची पूर्ण जाणीव असल्याने आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचा विषय न्यायालयात लावून धरला होता. अनेकदा अडसूळ यांच्याकडून न्यायालयात आज असा निर्णय झाला वगैरेचे पत्रक काढले जायचे. त्यावर प्रसार माध्यमातून चर्चा व्हायची तर त्यावर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून येणारे खुलासेही तितक्याच ताकदीचे असल्याने हा विषय 2014 ते 2019 पर्यंत नेहमीच चघळला जायचा.

नवनीत राणा यांचा संग्रहित फोटो

2019 च्या निवडणुकीत मागे पडला जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा -

खरं तर 2014 मध्ये पराभव झाल्यावर नवनीत राणा लगेच मतदारसंघात सक्रिय झाल्या. त्यांचे मेळघाटात झंझावाती दौरे पाचही वर्ष सुरूच होते. मेळघाटसह मतदार संघातील सर्व भागात नवनीत राणा सतत दौरे करीत असल्याने त्यांनी आपला जनसंपर्क आणि लोकांमध्ये विश्वास वाढवला. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी स्वतंत्र उमेदवारी घोषित केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला. नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस आल्याचा आवाज आनंद अडसूळ यांनी वाढवला मात्र मतदारांनी कोणाची जात खोटी आणि कोणाची जात खरी या भानगडीत न पडता यावेळी आनंदराव अडसूळ यांचा पराभव करायचा आणि नवनीत राणा यांना निवडून द्यायचा हाच विचार पक्का केला होता. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 3 हजार 822 मतांनी पराभव केला.

नवनीत राणा लुभाणा की मोची ?

नवनीत राणा यांना 30 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी अनुसूचित जातीत मोडणाऱ्या मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. 3 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबई उपनगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र जारी केले होते. त्या आधारावर नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या. त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत अनुसूचित जातीचे घोषणापत्र जोडले होते. त्या घोषणपत्रावरच आनंद अडसूळ यांनी आक्षेप घेतला होता. नवनीत राणा या पंजाब मधील लुभाणा जातीच्या आहेत. तसे पुरावे सुद्धा पंजाब मध्ये नवनीत राणा यांच्या वडिलांच्या मूळ गावी जावून अडसूळ यांच्या कार्यकर्त्यानी मिळवले आल्याचे सांगण्यात येते. नवनीत राणा या मोची नाहीत तर लुभाणा जातीच्या आहेत आणि लुभाणा ही जात अनुसूचित जातीत मोडत नाही असाच दावा आनंद अडसूळ यांनी केला आहे. आता उच्च न्यायालयानेही आनंद अडसूळ यांचा दावा ग्राह्य ठरवला असून नवनीत राणा या खरंच मोची आहेत की लुभाणा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट होईल.

Last Updated : Jun 10, 2021, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details