अमरावती -पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील निधीसाठी बैलबंडी, गाढवासह आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदवर मंगळवारी (दि. 16 जून) डेरा आंदोलन केले. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलनकर्त्यांनी नगर परिषद कार्यालय परिसरात डेरा टाकला आहे. जोपर्यंत निधीचे ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत हे डेरा आंदोलन तसेच सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी आता घेतला आहे. यावेळी पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता. या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व नगरपरिषदेचे माजी सभापती मेहमूद हुसेन यांनी केले. या आंदोलनात लहान मुलांसह लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले आहे.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी आम आदमी पक्षाकडून नगरपरिषदेवर 'ताला ठोको' करण्यात आले होते व आंदोलनादरम्यान आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या टप्प्यातील निधी लाभार्थ्यांना मिळाला होता. तर आता तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी लाभार्थ्यांना नगरपरिषदेच्या चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मागणीनुसार तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी आम आदमी पक्षाने निवेदन देऊन 14 जूनपर्यंत अल्टीमेटम दिला होता. तत्काळ निधी न मिळाल्यास 15 जुनला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले आहे. तसेच नव्याने मजूर झालेल्या 405 घरकुल लाभार्थ्यांनाही पहिला टप्पा देण्याची मागणी करण्यात आली आहे.