अमरावती - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या पीएसआय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत तिवसा तालुक्यातल्या पालवाडी गावातला तरुण उत्तीर्ण झाला आहे. रोशन राऊत असे त्याचे नाव असून तो एका शेतमजुराचा मुलगा आहे.
रोशन आता महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणार आहे. कुठलेही शिकवणी वर्ग न लावता केवळ वाचनालयात तासंन् तास बसून त्याने हे यश संपादन केले असल्याचे रोशनचे मित्र सांगत आहेत. पालवाडी गाव अमरावती शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. गावतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रोशनने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण कुऱ्हात पूर्ण केले. त्यानंतर त्याने तिवसात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. रोशन सकाळी शेतातील कामे करत असे. त्यानंतर तो तिवसातल्या राजर्षी शाहू महाराज वाचनालयात रात्री १० वाजेपर्यंत अभ्यास करत होता. त्यासाठी तो रोज ३ किमी पायी जात असे. रोशनने परीक्षेची तयारी २०१६ पासून सुरू केली होती.