दुर्गापुरात पुन्हा बिबट्याने घेतला 45 वर्षीय महिलेच्या नरडीचा घोट - राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर
बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीकडे वेकोली प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या भटारकर यांनी वेकोली कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर वेकोली आणि वनविभागाला जाग आली आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धस्तरावर मोहीम राबवली. या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, काल रविवारी एका दुसऱ्या बिबट्याने गीता मेश्राम या महिलेला ठार केले. त्यामुळे पून्हा एकदा या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
चंद्रपूर - दुर्गापूर येथील बिबट्याची दहशत संपली, असे गृहीत धरताच काल रात्री बिबट्याने एका 45 वर्षीय महिलेला भक्ष बनवले. ही महिला घरी असताना तिच्यावर हल्ला करत ठार केले. मृत महिलेचे नाव गीता मेश्राम असे आहे. या घटनेने पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यातही दुर्गापूर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात यापूर्वी एका 16 वर्षीय मुलाचा आणि नंतर 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर हे आक्रमक झाले. यापूर्वी त्यांनी केलेल्या आमरण उपोषणाच्या वेळी या परिसरातील झाडेझुडुपे हटविण्यात येणार, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याकडे वेकोली प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या भटारकर यांनी वेकोली कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर वेकोली आणि वनविभागाला जाग आली आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धस्तरावर मोहीम राबवली. या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, काल रविवारी एका दुसऱ्या बिबट्याने गीता मेश्राम या महिलेला ठार केले. त्यामुळे पून्हा एकदा या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.