अमरावती - शहरातील ख्रिस्त कॉलनी येथे असणाऱ्या आशादीप गतिमंद शाळेजवळ, रविवारी सकाळी राहायला आलेली 7 वर्षांची गतिमंद चिमुकली हरवली आहे. सुप्रिया श्याम काबरा, असे हरवलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
अमरावतीत मतिमंद चिमुकली हरवली, 24 तास उलटूनही बेपत्ताच - police
अमरावतीच्या कॅम्प परिसरात ख्रिस्त कॉलनी येथून, रविवारी दुपारी 3.30 वाजता 7 वर्षांची गतिमंद चिमुकली बेपत्ता झाली. आशादीप गतिमंद शाळेजवळ रविवारी सकाळीच ही मुलगी राहायला आली होती.
चांदूरबाजार येथील मुळ रहिवासी असलेल्या प्रीती काबरा आपल्या दोन मतिमंद मुलींना शाळेत सहज जाता यावे, यासाठी त्या रविवारी ख्रिस्त कॉलनी येथे आशादीप गतिमंद शाळेजवळ क्षीरसागर यांच्या घरात राहायला आल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पतीच्या निधनानंतर, प्रीती काबरा आपल्या 7 आणि 4 वर्षांच्या दोन्ही गतिमंद मुलींचा सांभाळ करीत आहेत. गेल्या वर्षी सुप्रियाला अमरावतीच्या आशादीप मतिमंद शाळेत दाखल केले होते. ती चांदूरबाजार येथून स्कूल व्हॅनने अमरावतीला यायची. यावर्षी सुप्रियाला शाळेत जाण्या येण्याचा त्रास होऊ नये, म्हणून प्रीती काबरा यांनी आपले बिराड अमरावतीला आणले होते. धामणगाव रेल्वे येथे राहणाऱ्या आई वडिलांना सोबत घेऊन, चांदूरबाजार येथून त्यांनी आपले सामान अमरावतीत आणले. दुपारपर्यंत घरात सामान रचणे सुरू होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुप्रिया कुठे दिसत नसल्याचे लक्षात येताच प्रिती काबरा घाबरल्या.