अमरावती -शहराच्या नूरानी चौक परिसरातील 16 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह युवकाच्या संपर्कातील एकूण 23 जणांना क्वॉरेंटाईन करून त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात त्या युवकाचे नातेवाईक आणि त्याच्या वडिलांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचा समावेश होता. 23 नमुन्यांपैकी 18 नमुन्यांचा अहवाल प्रशासनाला मिळाला असून हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 5 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिली.
नूरानी चौक परिसरातील एका रिक्षा चालकाचे 12 एप्रिलला निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील पत्नी आणि दोन मुलांचे थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणी अहवाल आल्यानंतर त्या मृत व्यक्तीचा 16 वर्षांचा मुलगा हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना कोविड -19 रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या युवकाची आई आणि भावाचे अहवाल मंगळवारी प्रशासनाला मिळाले. हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर इतर 16 नमुने देखील निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती शहराची आरोग्य यंत्रणा अतिशय नियोजनबद्धपद्धतीने रुग्णांवर योग्य ते उपचार करत आहे. त्यांची योग्य प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
तिघांचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह -
हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारानंतर सदर व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी त्यांचे स्वॅब पुन्हा पाठवण्यात आले. त्यानुसार त्यांचा प्रथम चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. याबाबत दक्षता म्हणून द्वितीय चाचणी पुन्हा घेण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवालही आला असून चौघांपैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. चौथा अहवालही लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.
64 प्रलंबित अहवाल, 40 नवीन पाठवले -
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून मंगळवारी कारोना तपासणी अहवालाचा तपशिल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 हजार 387 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यांना होम क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे. तसेच 655 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवले, त्यापैकी 503 जणांचे अहवाल निगेटिव्ह आणि सहा जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून पाच जणांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 82 जणांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले असून त्यापैकी काही थ्रोट स्वॅब पुन्हा तपासणीला पाठवण्यात आले आहे. 64 थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. मंगळवारी नवीन 40 नमुने पाठवण्यात आले तर 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले. 322 कोरोना संशयितांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात सध्या 15 व्यक्ती उपचार घेत आहे. प्रलंबित थ्रोट स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होणार आहे. या नमुन्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी अपेक्षा प्रशासनला आहे.