महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निपाणा येथे तरुण शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या - young farmer

शेतातील सोयाबीन पाण्याअभावी सुकत असल्याच्या विवंचनेने तसेच बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना निपाणा गावात घडली. दुष्काळी परस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे.

विहिरीतील अँगलला घेतला गळफास

By

Published : Jul 21, 2019, 6:02 PM IST

अकोला - अकोला तालुक्यातील निपाणा येथील तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. गजानन महादेव राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

निपाणा येथे तरुण शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

गजानन राऊत यांच्याकडे शेती असून ते कुटुंब प्रमुख आहेत. दोन चिमुकली मुले, पत्नी आणि आई असा त्यांचा परिवार आहे. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकाची वाढ खुंटली. शनिवारी पाऊस पडल्यानंतर रविवारी सकाळी शेतातील पीक पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून गजानन राऊत घरून निघाले. सकाळपासून गेलेले गजानन राऊत घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांना पाहण्यासाठी शेतात गेली. तेथे विहिरीत त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. गावात वार्ता पसरताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली.

बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. गजानन राऊत यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याचे समजते. पीक परिस्थितीमुळे ते विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. राऊत कुटुंबियांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. ठाणेदार हरिश गवळी पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details