अकोला - घरामध्ये विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि धारदार शस्त्र लपवून ठेवणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली. या प्रकरणात दोघांविरोधात जुने शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोल्यात पिस्तूल आणि धारदार शस्त्रासह दोघे जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई रामनवमी सण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. रामनवमीनिमित्त गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भगीरथ वाडी, वाशिम बायपास येथे राहणाऱ्या विजय भटकर याच्या घरात पिस्तूल ठेवण्यात आले आहे. तर दुर्गा चौक शिवसेना वसाहत अकोला येथे राहणारा कोमल कुतरमारे याच्या घरात स्टेनलेस स्टीलचे चॉपर (कुकरी) लपवून ठेवण्यात आली आहे.
हे दोघेही आरोपी लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून दोन्ही आरोपींच्या घरी एकाच वेळेस छापा टाकला. या कारवाईत आरोपी विजय भारत भटकर याच्या घराच्या झडतीतून एक विदेशी बनावटीचे देशी पिस्तूल (कट्टा) पाच हजार रुपये मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.
कोमल सुभाष कुतरमारे याच्या राहत्या घरी छापा टाकून त्याच्या घराची झडती घेतली असतास, घरात पलंगाखाली एक स्टेनलेस स्टीलचा चॉपर (कुकरी) ५०० रुपये मिळून आले. त्याला अटक करून त्याच्याजवळील शस्त्र जप्त केली आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक चाटी, शेख हसन, आशु मिश्रा, फिरोज खान, अब्दुल माजीद, एजाज अहमद, रवि इरछे, अभय बावस्कर, शेख नफीस, अनिल राठोड, रोशन पटले, महिला पोलीस तृष्णा घुमण, ज्योत्स्ना लाहोळे यांनी केली.