अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखीन दोघांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. दरम्यान, या पाचही जणांना अकोट न्यायालयात स्थानिक गुन्हे शाखेने आज हजर केले होते. न्यायालयाने आधी अटक असलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून नव्याने पकडण्यात आलेल्या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा...प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर खून प्रकरण : चुलत भावाच्या खुनाचा घेतला बदला
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ 21 फेब्रुवारी रात्री गोळ्या कडून त्यांची हत्या केली होती. तेजस सेदानी यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती पवन सेदाणी, श्याम नाठे, अल्पेश दुधे यांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेला चौकशी दरम्यान दिली होती. त्यांना न्यायालयाने 4 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर पोलिसांनी चौकशीत हत्येत वापरण्यात आलेल्या दुसरे पिस्तूल हे अकोट येथील एका विहिरीतून जप्त केले. तसेच दोन्ही पिस्तूल मध्य प्रदेशातून आणून देणाऱ्या दोघांना अटक केली. निखील सेदाणी व गुंजन चिचोळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने या सर्वांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पवन सेदानी, श्याम नाठे, अल्पेश दुधे या तिघांना नऊ एप्रिल पर्यंत तर निखिल सेदानी व गुंजन चिंचोळे या दोघांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची आदेश बजावले.