अकोला:जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे जोराचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आणि गारपिटीने अकोलेकर त्रस्त झालेले आहेत. ग्रामीण भागामध्ये या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. याच दरम्यान आज रात्री बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे असलेल्या मंदिरावर असलेले टीन सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाले आहेत. यामुळे अनेक भक्त गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळीत पोलीस यंत्रणाही दाखल झाली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. अनेक भक्तांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मुसळधार पावसात अनेक भक्त हे सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी धावत होते. संपूर्ण ठिकाणी धावपळ उडाली असून या परिसरात वीज पुरवठाही खंडित झाला. यामुळे धावपळीत चेंगराचेंगरी झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग तसेच आरोग्य यंत्रणा दाखल झाले असल्याचे समजते.
दर रविवारी भरतो दरबार:पारस येथेदर रविवारी या संस्थांमध्ये दरबार भरत असतो. या दरबारामध्ये राज्यभरातीलच नव्हे तर परराज्यातील भक्त सहभागी होतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर रविवारी गर्दी असते. आजही या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. रात्री आठ ते साडेआठ दरम्यान आलेल्या वादळ आणि पावसामुळे या संस्थांवरील टिन उडून गेले आणि त्यामध्ये हा प्रकार घडला.