अकोला- बैल पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्येही दोन जण बैल धुण्यासाठी गेले असता तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गाव तलावात बुडाल्यानंतर त्याला नागरिकांनी बाहेर काढले. मात्र, नदीत वाहून गेलेल्या इतर दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. सागर गोपाळ कावरे आणि गोपाल महादेब कांबे, असे नदीत वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सर्वत्र पोळा उत्सव साजरा होत असताना या दिवशी बैलांची पूजा करण्याची प्रथा आहे. बैल धुण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे जवळच्या नदीवर जातात. नदीवर बैलांना धुतल्यानंतर ते घरी आणून त्याची पूजा करत असतात. मात्र, बराच वेळा नदीला पाणी जास्त असल्याने अनेक युवक किंवा नागरिक हे नदीच्या पात्रामध्ये वाहून जात असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.