अकोला - मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना एका भरधाव टेम्पोने उडवल्याची घटना अकोट-अंजनगाव मार्गावर आज पहाटे घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अकोट ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो जप्त केला असून चालकास अटक केली आहे. शालिग्राम उत्तमराव राऊत, उत्तमराव किसनराव नाठे, गजानन नेमाडे अशी मृतांची नावे आहेत.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना भरधाव टेम्पोने उडवले; तीन ठार, एक जखमी - मॉर्निग वॉकवेळी अपघात
अकोट अंजनागाव महामार्गावर भीषण अपघात. व्यायामासाठी गेलेल्या ४ पादचाऱ्यांना एका भरधाव टेम्पोने उडवले आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
अकोट तालुक्यातील अकोट-अंजनगाव मार्गावर परिसरातील नागरिक पहाटेच्यावेळी मार्निगवॉकला जातात. आज पहाटेच्या सुमारास नियमितपणे काही नागरिक रस्त्याच्याकडेवरून जात असताना, एका भरधाव टेम्पोने( एमएच 20 डीई 7433) चार पादचाऱ्यांना चिरडले. या भीषण अपघातामध्ये तीन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अकोट व तिथून अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्याल येथे पाठविले असता दोघांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.