अकोला - पोलीस उपनिरीक्षकाची सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेली पिस्तूल व जिवंत काडतुसे त्यांच्याच घरामागील पटांगणात सापडली आहेत. जुने शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने ही शोधमोहीम यशस्वी केली. या मोहिमेत पिस्तूल व काडतुसे सापडली असून, दागिन्यांचा शोध अद्यापही चालू आहे.
पोलीस उपनिरीक्षकाचे चोरीस गेलेले पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडली; दागिन्यांचा शोध सुरू - अकोला पोलीस शोधमोहीम
पोलीस उपनिरीक्षकाची सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेले पिस्तूल व जिवंत काडतुसे त्यांच्याच घरामागील पटांगणात सापडली आहेत. जुने शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने ही शोधमोहीम यशस्वी केली. या मोहीमेत पिस्तूल व काडतुसे सापडली असून, दागिन्यांचा शोध अद्यापही चालू आहे.
गीता नगरमधील पोलीस वसाहतीत दोन दिवसांपूर्वी राहाण्यास आलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे दागिने तसेच, एका सर्व्हिस रिव्हॉल्वरसहित दहा जिवंत काडतुसे लंपास केली. या घटनेनंतर पोलीस वसाहतीत एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ व जुने शहर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांचे पथक आले होते.
जुने शहर पोलिसांच्या माध्यमातून घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरामागील खुल्या पटांगणात दहा काडतुसांनी भरलेली पिस्तूल पोलिसांना सापडली. श्वान पथकातील लक्ष्मी नामक श्वानाने ही पिस्तूल शोधून काढली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.