अकोला- जुन्या शहरातील गीता नगरातील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केला आहे. चोरट्यांनी एक ९ एमएम पिस्तूल आणि दहा जीवंत काडतूसासह ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनेला ५ दिवस उलटूनही या चोरीतील मुख्य मुद्देमाल पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुस ही दहा जणांना जिवंत मारण्यास उपयुक्त असल्याने या चोरट्यांच्या मुठीत आता दहा जणांचा जीव आहे.
दहा जणांचा जीव चोरट्यांच्या मुठीत; चोरी गेलेली पिस्तुल, जिवंत काडतूसचा लागला नाही शोध
पोलीस उपनिरीक्षकाच्या घरातून चोरट्यांने एक पिस्तूल आणि दहा जिवंत काडतूसासह ६० हजारांचे सोने लंपास केले होते. चोरी होऊन पाच दिवस उलटले तरीही चोरट्यांचा शोध लागला नाही.
पोलीस उपनिरीक्षक राजेश नानाजी जोशी हे अकोला पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या घरी चोरीची घटना २१ जुलैला घडली होती. या घटनेला आज ५ दिवस झाले असले तरी या घटनेतील आरोपींचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुस यांचा चोरट्यांनी दुरुपयोग केल्यास ते दहा जणांचा जीव घेऊ शकतात किंवा कोणासही ओलीस ठेवून कोणतीही अनुचित घटना घडवू शकतात. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना दिवस-रात्र एक करावी लागणार आहे. घटनेच्या चार दिवस आधी रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे.
हा चोरीचा गुन्हा पोलिसांसाठी नियमित असला तरी या गुन्ह्यात मात्र पिस्तूल आणि जिवंत काडतूस चोरी गेल्याने या गुन्ह्याला गांभीर्य प्राप्त झाले आहे. परंतु, जुने शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांकडून मात्र या गुन्ह्याबाबत गांभीर्य घेण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. अद्यापही पोलिसांना या गंभीर गुन्ह्यातील एकही सुगावा लागला नसल्याचे समजते.