अकोला- शिवसेना वसाहतीमधील जागा नियमित करून प्रधानमंत्री आवास योजनेची अमलबजावणी करुन घरकूल देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. त्यावेळी चिडलेल्या शिवसैनिकांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच महापालिका आयुक्त यांच्या कक्षासमोर येऊन घोषणाबाजी केली. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी महापालिका आयुक्तांच्या कक्षासमोर 'डेरा आंदोलन' केले.
2016 पासून महापालिकेत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. परंतु, ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. गावठाण, अतिक्रमण आणि गुंठेवारीची घरकुलची प्रकरणे अद्यापही पूर्ण झालेली नाही. तर काहींना घरकुलचा पहिला हप्त्यानंतर पुढील हप्ता न दिल्याने अनेक जण उघड्यावर आले आहेत. काही जण हे भाड्याच्या घरात राहत आहेत. आधीच कमी वेतनात जीवन जगणाऱ्या या लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढविण्याचे काम पालिका प्रशासन आणि पालिकेती भाजप सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या अश्विन नवले यांनी केला आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी अश्विन नवले आणि नगरसेविका सपना नवले, नगरसेवक शशिकांत चोपडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आलेल्या आंदोलकांनी प्रवेशद्वार उघडण्यास पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना सांगितले. परंतु, त्यांनी प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. शेवटी आतमध्ये असलेल्या शिवसेना नगरसेवक गजानन चव्हाण यांनी दगडाच्या सहायाने प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. त्यानंतर आंदोलक हे आतमध्ये आले. पालिकेच्या आवारात येताच त्यांनी जोरदार घोषणेबाजी केली.